सातबारा उताऱ्यासह इलेव्हनीमध्ये होणाऱ्या तक्रारींचे निवारण करा : जिल्हाधिकाऱ्यांची महसूल अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : महसूल विभागात जमिनीसंदर्भातील अनेक प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे त्वरित निकालात काढण्यात यावीत व सातबारा उताऱ्यासह इलेव्हनीमध्ये होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे. आलेले अर्ज निकालात काढावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. येथील जिल्हा पंचायत कार्यालयात जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली होती. महसूल खात्यामध्ये असणाऱ्या प्रलंबित प्रकरणांची व अर्जांचे त्वरित निवारण करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूल खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या भूमी विभागाचे आता संगणकीकरण करण्यात आले आहे. यामुळे शेती उतारे व ई-इलेव्हनी नक्षा काढताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जमिनी हद्दबद्ध नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. इलेव्हनी नक्षा काढताना जमिनी हद्दबद्ध नसल्याकारणाने अडचण निर्माण होऊन अनेक व्यवहारांसाठी अडचण ठरत आहे. यामुळे जमिनीच्या तक्रारी वाढत आहेत. तर हद्दबद्ध नसल्याने सॉफ्टवेअरही जमिनींच्या संदर्भातील आरटीसी उतारा तयार करताना तांत्रिक दोष दाखवत आहे. अशी प्रकरणे त्वरित दूर करून पैकी जमिनींच्या प्रकरणांचाही निकाल लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी ज्या तालुक्यामध्ये अधिक प्रकरणे प्र्रलंबित आहेत, त्या तालुक्यातील तहसीलदारांना बोलावून प्रकरणे निकालात काढण्यासाठी सूचना केली. तालुक्यानुसार आढावा घेण्यात आला. सदर काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल अधिकाऱ्यांना केली.









