आजपासून शाळा सुरू होणार : 14 दिवसांनंतर बांधकाम आणि ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमधील लोकांना प्रदूषणापासून आणखी काहीसा दिलासा मिळाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वाऱ्यांची दिशा बदलल्याने प्रदूषण पातळीत घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. आता प्रदूषण प्रतिबंध आयोगाने ग्राप-4 चे कठोर निर्बंध उठवले. परंतु ग्राप-3 अंतर्गत निर्बंध अजूनही कायम राहतील. म्हणजेच खासगी बांधकाम आणि बीएस-3/4 डिझेल वाहनांवर बंदी कायम राहणार आहे.
प्रदूषण प्रतिबंध आयोगाने दिल्ली-एनसीआरच्या अधिकाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे. दिल्ली आणि एनसीआरमधील हवेत शनिवारी सुधारणा दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत सरासरी एक्यूआय कमी झाला. ही सुधारणा लक्षात घेऊन एक्यूआयच्या उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. येत्या काही दिवसांत हवा फार वेगाने प्रदूषित होण्याची शक्मयता नाही. प्रदूषण पातळीतील सुधारणा लक्षात घेता, उपसमितीने दिल्ली-एनसीआरमधून ‘ग्राप’चा चौथा टप्पा काही काळासाठी मागे घेतला आहे. मात्र, ग्राप-1, 2 आणि 3 चे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
ग्राप-4 काढून टाकल्यामुळे आता दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये उघडता येणार आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, एलएनजी/सीएनजी आणि इतर ट्रकसह इलेक्ट्रिक ट्रकही धावू शकतील. तसेच बांधकामाच्या बाबतीत महामार्ग, रस्ते, उ•ाणपूल, ओव्हरब्रिज, पाईपलाईन, वीज यासंबंधीच्या सरकारी प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. मात्र, खासगी बांधकामे बंद राहतील.









