ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवली; 9 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीतील वाढत्या हवा प्रदूषणामुळे अरविंद केजरीवाल सरकारने काही दिवसांपूर्वी लागू केलेले निर्बंध सोमवारी उठवले. आता प्राथमिक शाळाही 9 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली असून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचनाही रद्द करण्यात आल्याचे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितले. याशिवाय महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, पाईपलाईन, वीज यासंबंधीच्या बांधकामावरील बंदी हटवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, खासगी तोडफोड आणि बांधकामांवर बंदी आणखी काही दिवस राहणार असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी सांगितले.
6 नोव्हेंबर रोजी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत प्रदूषण पातळीचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिल्लीत हवा प्रदूषणाचा एक्यूआय 339 वर पोहोचल्याचे दिसून आले होते. यानंतर यापूर्वी समितीने घातलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीबरोबरच हरियाणातही एनजीटी ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनच्या (जीआरएपी) उपसमितीने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लादण्यात आलेला बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. आता ‘जीआरएपी’च्या पहिल्या टप्प्यापासून तिसऱया टप्प्यापर्यंत लादलेले निर्बंध कायम राहणार आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) वर नेहमीच लक्ष ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचना उपसमितीने दिल्यामुळे परिस्थिती बिघडल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.
दिल्लीसह हरियाणातील शहरांमध्ये ‘एक्यूआय’ सुधारण्यात पश्चिमेकडील वाऱयांचा मोठा वाटा आहे. पश्चिमेकडील वाऱयांच्या प्रभावामुळे हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्यामुळे वायू प्रदूषणात आणखी घट होणार आहे.









