बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक पिशव्या निर्बंध मोहीम तीव्रगतीने राबविण्यात येत आहे. याचबरोबर कापडी पिशव्या तसेच लवकरात लवकर खराब होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आला आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वडगाव, खानापूर रोड येथे शुक्रवारी ही जनजागृती करण्यात आली. तर त्याच परिसरात किराणा दुकान, स्वीटमार्ट यासह इतर दुकानांतून 5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. याचबरोबर 3 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्या वापरामुळे शहरामध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. प्लास्टिक पिशव्या डिस्पोझल करणे कठिण जात आहे. त्यामुळे पर्यावरण ऱ्हास पावत आहे. या पिशव्यांपासून जनावरांनादेखील धोका निर्माण होत आहे. यामुळे केंद्र सरकारनेच प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्लास्टिक वापराविरोधात महापालिकेच्यावतीने तीव्र मोहीम राबविण्यात येत आहे, असे डॉ. डुमगोळ यांनी सांगितले. प्लास्टिकवर निर्बंध घातले तरी कापडी पिशव्या वापरण्याबाबत तसेच नष्ट होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्याबाबतही जनजागृती केली जात आहे. महापालिकेचे कर्मचारी भर पावसात जनजागृती करत होते.









