वकिलांव्यतिरिक्त इतरांना चारचाकी नेण्यास बंदी
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा सत्र न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालय आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. वकिलांना चारचाकी पार्किंग करण्यासाठी जागाच उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता वकिलांव्यतिरिक्त इतरांना न्यायालयाच्या आवारात चारचाकी पार्किंग करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गुरुवारी केवळ वकिलांच्या वाहनांनाच आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अनेकांना बाहेरच पार्किंग करावे लागत आहे.
मुख्य जिल्हा सत्र न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगसाठी जागा कमी पडत आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे ज्ये÷ वकिलांबरोबरच ज्युनियर वकीलही चारचाकी वाहने घेऊनच न्यायालयाकडे येत आहेत. यातच या परिसरात काही रिअल इस्टेट एजंट तसेच इतर नागरिकही वाहने पार्किंग करून कामासाठी बाहेर जात होते. याची माहिती बार असोसिएशनला मिळाली. त्यामुळे बार असोसिएशनने यापुढे आता वकिलांव्यतिरिक्त या परिसरात इतरांना पार्किंग करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच मुख्य न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस बॅरिकेड्स लावून सुरक्षा रक्षक तैनात केले होते. ते केवळ वकिलांनाच प्रवेश देत होते.
पावसामुळे काही पक्षकारही चारचाकी वाहने घेऊनच न्यायालयाकडे येत होते. मात्र, त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रिअल इस्टेटधारक तसेच इतर कामानिमित्त बेळगावात आलेले अनेकजण न्यायालयाच्या आवारात पार्किंग करत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बार असोसिएशनने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे काही पक्षकारांना त्रास होणार आहे.









