शाळा-कार्यालयांना सुट्टी जाहीर : 8 ते 10 सप्टेंबरला लॉकडाऊनसारखी स्थिती राहण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत जी-20 शिखर परिषद होणार आहे. त्यादृष्टीने सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या समिटमध्ये बऱ्याच देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि उच्चपदस्थ अधिकारी येणार असल्यामुळे आतापासूनच दिल्लीत सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. या कालावधीत दिल्लीत बरेच निर्बंध लागू होणार असल्यामुळे सप्टेंबर महिना दिल्लीकरांसाठी थोडा कठीण जाणार आहे.
जी-20 परिषदेच्या कालावधीत तीन दिवस दिल्लीत ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती राहणार आहे. 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत शाळा, कार्यालये आणि बाजारपेठा बंद राहतील. एवढेच नाही तर दिल्लीचे रस्तेही ‘कोविड लॉकडाऊन’सारखे रिकामे दिसणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दरम्यान दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. जी-20 परिषदेदरम्यान दिल्लीतील सर्व हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवरही बंदी घालण्यात आली आहे. पण ठराविक हॉटेल्समध्ये विदेशातील प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांची सोय करण्यात आल्यामुळे तेथे स्वतंत्र व्यवस्था असेल.
समिट चालू असतानाच्या कालावधीत अन्य राज्यातील कोणीही दिल्लीला भेट देण्याचा विचार करत असेल तर त्यांना आपल्या नियोजनात बदल करावा लागेल. जी-20 दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव इंडिया गेट आणि जवळपासची सर्व पर्यटनस्थळे बंद राहतील. मात्र, दिल्लीतील वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. या दरम्यान, एक विशेष नियंत्रण कक्ष आयोजित केला जाईल आणि हेल्पलाईन 24 तास कार्यरत असेल. यासोबतच प्रमुख ठिकाणी वैद्यकीय आपत्कालीन वाहने तैनात करण्यात येणार आहेत.
अभेद्य सुरक्षा कवच
जी-20 परिषदेदरम्यान राजधानी दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांव्यतिरिक्त अन्य राज्यांमधील काही निवडक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. डीसीपी, अतिरिक्त सीपी, जॉइंट सीपी आणि स्पेशल सीपी दर्जाच्या 30 ते 40 आयपीएस अधिकाऱ्यांना कर्तव्ये वितरित करण्यात आली आहेत. हे सर्व आयपीएएस अधिकारी परदेशी तपास यंत्रणांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांनुसार येथील सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करत आहेत. यासोबतच इतर सुरक्षा यंत्रणाही एकमेकांच्या संपर्कात आहेत. एनएसए अजित डोवाल यांच्याकडे जी-20 सुरक्षा प्रणालीची संपूर्ण कमांड आहे.









