जिल्हा प्रशासनाचा आदेश : पशुसंगोपनाची खबरदारी, चार तालुक्यांत अतिदक्षता
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे सीमाहद्दीवर असलेल्या निपाणी, कागवाड, रायबाग, गोकाक, मुडलगी, चिकोडी, अथणी आदी ठिकाणी लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यातील जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लम्पी जीवघेण्या रोगामुळे जिल्ह्यात गतवर्षी 25 हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांना फटका बसला आहे. यंदादेखील महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्dयातील सीमाहद्दीवरील तालुक्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरम्यान प्रशासनाने जनावरांच्या सुरक्षततेसाठी आठवडी बाजार व बैलांच्या शर्यतीवर निर्बंध घातले आहेत.
विशेषत: निपाणी, चिकोडी, कागवाड, रायबाग, अथणी तालुक्यामध्ये लम्पीग्रस्त जनावरे आढळून येत आहेत. दरम्यान आठवडी बाजारातून या रोगाचा फैलाव वाढू नये, यासाठी जनावरांच्या आठवडी बाजारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गतवर्षी जनावरे दागावलेल्या नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. शेवटच्या टप्प्यातील पशुपालक भरपाईपासून वंचित आहेत. दरम्यान पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुपालंकानी आता जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. सीमाहद्दीवरील पशुपालकांनी जनावरांची वाहतूक करू नये, शिवाय लागण झालेले जनावर आढळून आल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.
जनावरांची काळजी घ्या
विशेषत: शेजारील महाराष्ट्र राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. खबरदारी म्हणून जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवले जात आहेत. सीमाहद्दीतील तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक थांबविण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. शिवाय लक्षणे दिसताच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
– डॉ. राजीव कुलेर (पशुसंगोपन सहसंचालक)









