जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रकार : रहदारी पोलिसांकडून वाहने पार्किंगला मनाई : दंडात्मक कारवाईची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग होत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी रहदारी पोलिसांनी याठिकाणी वाहन चालकांना पार्किंग करण्यास मनाई केली. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग दुपारपर्यंत कमी होते. मात्र दुपारनंतर पोलीस नसल्यामुळे पुन्हा वाहनांचे पार्किंग केल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या परिसरातील विविध कामे पूर्णत्वाला आली आहेत. हा रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनेही मोठ्या संख्येने ये-जा करत आहेत. मात्र कामानिमित्त आलेले अनेकजण चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग करून कार्यालयात जात आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. सध्या उन्हाचा तडाका आहे. त्यातच वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी रहदारी पोलीस नसल्यामुळे समस्या निर्माण होत होती. शुक्रवारी मात्र रहदारी पोलिसांनी या परिसरात वाहन चालकांना पार्किंग करण्यास निर्बंध घातले. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दुपारनंतर मात्र पुन्हा याठिकाणी वाहने पार्किंग करण्यात आली होती. अनेक रियल इस्टेट एजंट तसेच काहीजणांनी रस्त्यावरच दिवसभर वाहने पार्किंग करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.









