वाहन चालकांबरोबरच नागरिकांची मागणी, कोंडीची समस्या नित्याचीच
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, चव्हाट गल्ली, कचेरी गल्ली, उपनोंदणी कार्यालय परिसरात चारचाकी वाहने भररस्त्यातच पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. बऱयाच वेळा वादाचे प्रसंगही घडत आहेत. जिल्हा पंचायत कार्यालयासमोर तर दोन रांगांमध्ये चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत, तेही भर रस्त्यामध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. तेंव्हा रहदारी पोलिसांनी अशा चारचाकी वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते कचेरी रोड हा नेहमीच गजबजलेला रोड आहे. या रस्त्यावर जिल्हा पंचायत कार्यालय आहे. याचबरोबर जुने तहसीलदार कार्यालय, ग्रामीण पोलीस एसीपी, लोकायुक्त कार्यालय, एडीएलआर कार्यालय अशी सर्वच कार्यालये या रस्त्यावर आहेत. याचबरोबर स्टॅम्पवेंडर, झेरॉक्स व इतर सरकारी कामे करणारी सुविधा केंदे आहेत. त्यामुळे त्या दुकानांसमोर देखील दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजुला वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे नेहमीच समस्या निर्माण होत आहे. तेंव्हा या रस्त्यावर पार्किंग करण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.
चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली परिसराच्या कॉर्नरवरही वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे त्या गल्लीतून ये-जा करणाऱया इतर वाहनांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा तातडीने या परिसरातही रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या सिटी सर्व्हे कार्यालय, उपनोंदणी कार्यालय परिसरातही चार चाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून त्याकडेही रहदारी पोलिसांनी लक्ष देऊन वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
सध्या सणाचा महिना सुरू असून गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. त्यामुळे आणखीनच वाहतुकीची कोंडी होण्याची शक्मयता आहे. तेंव्हा पोलिसांनी आतापासूनच या परिसरातील पार्किंगवर निर्बंध घालून शिस्त लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.









