ऑटोरिक्षा चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उपासमारीची वेळ
बेळगाव : सरकारने महिलांना मोफत बस प्रवास योजना सुरू केली. मात्र यामुळे आमच्या पोटावर पाय देण्यात आला आहे. या योजनेमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे शहरापासून 20 ते 25 कि.मी. अंतरानंतर ही योजना सुरू करावी, अशी मागणी ऑटोरिक्षा ओनर्स अॅण्ड चालक असोसिशएनतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले असून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे याची प्रत सोपविली आहे. मोफत बस प्रवासामुळे ऑटोरिक्षा व्यवसाय संकटात आला आहे. एक तर रिक्षा घेताना बँक किंवा सोसायट्यांमधून कर्ज घेणे, त्यानंतर त्या रिक्षा सुरू करणे. यामुळे हा व्यवसाय अडचणीतच होता. यातच आता मोफत बसप्रवास महिलांसाठी केल्यामुळे प्रवासी मिळणे अवघड झाले आहेत. शहरातील अनेक बस थांब्यांवर उभ्या असलेल्या महिला बसमधूनच प्रवास करत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रवासी मिळणे अवघड झाले आहे. शहर, उपनगरांमधून येणाऱ्या बसमधून त्या महिला ये-जा करत असल्यामुळे शहरातील आणि उपनगरांतील सर्व रिक्षा चालकांवर संकट कोसळले आहे. तेव्हा याचा सरकारने सारासार विचार करुन किमान 25 कि.मी. पर्यंत तरी कोणताही प्रवास मोफत सुरू करु नये, असे या निवेदनात म्हटले आहे. सध्याच्या महागाईमध्ये जीवन जगणे अवघड आहे. पूर्वी 500 रुपये व्यवसाय होत होता. मात्र आता केवळ 150 ते 200 रुपये व्यवसाय होत आहे. त्यामुळे हप्ते भरणे देखील अवघड झाले आहे. येत्या 15 दिवसांत सरकारने याचा विचार करुन या योजनेवर काही निर्बंध घालावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा यवेळी संघटनेचे मन्सूर अब्दुलगफार होनगेकर यांनी दिला आहे. निवेदन देण्यासाठी शहरातील विविध ऑटोरिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









