बांधकाम कामगारांची मागणी : कामगार खात्याला निवेदन
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणारे लॅपटॉप, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा ठप्प झाल्या आहेत. शिवाय कामगारांच्या वेतनातही कपात झाली आहे. शिवाय घरकुलाचे अनुदानही थांबले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तातडीने बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कामगार खात्याचे उपायुक्त अमरेंद्र यांच्याकडे दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात 15 लाखाहून अधिक बांधकाम कामगार आणि रोहयो कामगार आहेत. मात्र या कामगारांना कामगार कल्याण मंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा ठप्प झाल्या आहेत. याबाबत कामगार खात्याला कित्येक वेळा निवेदने देऊनदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कामगार खात्याच्या उपायुक्तांकडे जोरदार मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारे लॅपटॉप आणि शिष्यवृत्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे गोरगरीब कामगारांच्या मुलांना शिक्षणात अडचणी येऊ लागल्या आहेत. बांधकाम कामगारांना घरासाठी देण्यात येणारे अनुदानही ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक कामगारांना स्वत:च्या घरकुलापासून वंचित रहावे लागले आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा निधी कामगारांच्या कल्याणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जाऊ नये, अशी मागणी कामगारांनी दिली आहे. बांधकाम कामगारांच्या भविष्यासाठी देण्यात येणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करावी. त्याबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांच्या विवाहासाठी देण्यात येणारी रक्कमही बंद झाली आहे. त्यामुळे मुलांच्या विवाहासाठी कामगारांना आर्थिक चणचण जाणू लागली आहे. कामगार कल्याण मंडळाने तातडीने सर्व सुविधा पूर्ववत कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.









