ग्राम पंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे परिवहनला निवेदन
बेळगाव : मुचंडी गावची बससेवा बंद झाल्याने प्रवासी आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतर गावच्या बसेस बसथांब्यावर थांबविल्या जात नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गावची बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. बससेवा पूर्ववत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. गावातून शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबर नोकरदार आणि कामगारांची संख्यादेखील अधिक आहे. मात्र गावची बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे. विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. महिलांना मोफत प्रवास असूनदेखील खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्याबरोबर विद्यार्थ्यांनादेखील पास असून आर्थिक फटका बसत आहे. गावाला स्वतंत्र बसफेरी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी लक्ष्मण बुड्य्रागोळ, संदीप जकाणे, विनायक चौगुले, मारुती कुंडेकर, राहुल आवाने, गजानन वर्पे आदींनी परिवहनचे डीटीओ के. के. लमाणी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.









