वृत्तसंस्था/ कराची
सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. उभय संघामध्ये तीन सामन्यांची ही मालिका सुरू आहे. दरम्यान सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीला विश्रांती देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे पाकचा आणखी एक खेळाडू खुर्रम शेहजादलाही पाठदुखापत झाली असल्याने तो या कसोटीत खेळणार नाही.
अलीकडे शाहीन शहा आफ्रिदीवर सलग सामन्यांमुळे अधिक ताण असल्याचे दिसून येते. सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी त्याला कदाचित विश्रांती दिली जाईल, असा तर्क आहे. या मालिकेतील पर्थच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकचा 360 धावांनी पराभव केला होता. पाकच्या खुर्रम शेहजादने आपले कसोटी पदार्पण करताना या सामन्यात पाच गडी बाद केले होते. या मालिकेतील दुखापतीमुळे शेहजादला दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. आता या मालिकेतील शेवटची आणि तिसरी कसोटी सिडनीत 3 जूनपासून खेळवली जाणार आहे. पर्थच्या कसोटीमध्ये शाहीनने दोन गडी बाद केले होते. 26 डिसेंबरपासून मेलबोर्न येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकवर विजय मिळविला तर सिडनीच्या तिसऱ्या कसोटीसाठी शाहीनला विश्रांती दिली जाईल, अशी चर्चा आहे. मेलबोर्नच्या दुसऱ्या कसोटीत शाहीन आफ्रिदीकडून चांगली कामगिरी झाली नाही तर मात्र त्याला शेवटच्या कसोटीसाठी निश्चित विश्रांती दिली जाईल, असे सांगण्यात आले. या कसोटी मालिकेनंतर तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पाकची न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.









