चिपळूण :
‘तरुण भारत संवाद’च्या टीमने मंगळवारी रात्री जागून शहराचा आढावा घेतला. शहरातील ६५ हजार नागरिकांची जबाबदारी अवघ्या २० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर असल्याचे वास्तव दिसून आले. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपल्या गस्तीची हद्द वाढवल्याचे दिसून आले. या साऱ्या घडामोडीत शहर मात्र निवांत झोपले होते.
गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी कशी तैनात असते, नागरिक नेमकी काय जबाबदारी पार पाडतात याचा आढावा घेण्यासाठी ‘तरुण भारत संवाद’च्या टीमने मंगळवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत शहर परिसरात जणू गस्तच घातली. यावेळी अनेक बाबी प्रकर्षाने जाणवल्या. २०११ सालच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५५ हजार १३९ असली तरी सध्या ती ६५ हजारावर गेली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत शहरात ३१ हजार ४४७ मालमत्ता आहेत. शहरात सुमारे ८ हजार इमारती व ५ हजार घरे आहेत. असे असताना रात्रीच्यावेळी नागरिकांची काळजी घेण्यासाठी अवघे २० पोलीस अधिकारी, कर्मचारी शहरात तैनात असतात.

- गस्तीवर भर
काही वर्षे मागे जाता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचनाका, बाजारपेठ, गांधीचौक, भेंडीनाका आदी भागात प्रत्येकी दोन-तीन पोलीस कायम तैनात असायचे. ते चालतच फिरायचे, त्यामुळे चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण असायचे. मात्र आता परिस्थिती बदलली असून यातील बहुतेक भागात पोलीस दिसून आले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काहीतास बरेच पोलीस होते. मात्र २.२५ वाजता येथेही एकही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. मात्र व्हॅन गस्त घालताना दिसली. सध्या वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी शहर परिसरात सातत्याने गस्त घालण्यावर भर दिल्याचे दिसले.
- बऱ्याच भागात अंधार
शहरातील चिंचनाका भाग दिवसा गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र रात्री येथे शुकशुकाट दिसतो. त्यातच या महत्वाच्या भागात पथदीपांची कमतरता दिसली. तसेच गांधीचौकासह अन्य काही भागातही अंधार दिसला. त्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा उठवण्यापूर्वीच येथे पथदीप वाढवण्याची गरज आहे.
- सीसीटिव्ही, भटक्या कुत्र्यांचा पहारा
शहरातील बऱ्याच भागात आता अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांच्या अनुपस्थितीत हे कॅमेरे व शेकडो भटकी कुत्री शहरात पहारा देत असल्याचे दिसले. भटकी कुत्री तर बहुतांशी वाहनांचा पाठलाग करीत होती. त्यामुळे त्यांची ही दहशत चोऱ्या रोखण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

- आमच्या कारचाही पोलिसांनी टिपला फोटो
आम्ही सर्वजण कारने फिरत असताना गस्तीला असलेल्या पोलिसांनी आमच्याही कारचा फोटो टिपला. बुलटेवरून फिरणारे पोलीस आपल्या हजेरीची साक्ष देण्यासाठी ठरलेल्या पाँईटवर फोटोग्राफी करीत होते. तसेच रस्त्यावरून दुचाकीने फिरताना गल्लीबोळात बॅटरी मारुन खातरजमा करीत होते.
- चौथ्या स्तंभाच्या गस्तीदरम्यान…
रात्री रस्ते मोकळे राहत असल्याने धूमस्टाईलने दुचाकी हाकणाऱ्या तरुणांचे दर्शन झाले. (चिंचनाका ०१.१५)
नगर परिषदेच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी तातडीने उचलला गेला. (१.१०)
तहसीलदार कार्यालयातील नियंत्रण कक्षही सुरू होता. (१.२०)
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपस्थित पोलिसांनी आमची कार थांबवून चौकशी केली. तसेच आमच्या कारचा फोटो टिपला. (०१.४४)
अनेक तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले पोलीस त्यानंतर दिसले नाहीत. केवळ पोलिसांची व्हॅन गस्त घालताना दिसली. (०२. २५)
शहरात दुचाकीवरून गस्त घालणारे पोलीस गल्लीबोळात बॅटरी मारून परिस्थितीचा अंदाज घेत होते. (०२.३०)
शहरातील बहुतांशी एटीएम मशिनजवळ सुरक्षारक्षक दिसले नाहीत. (०२.४०)
शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मृत व जीवंत सापांचे दर्शन झाले. (०३.३०)
आमच्या गस्तीदरम्यान चारवेळा पोलिसांची व्हॅन शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात गस्त घालताना दिसून आली








