बैलहोंगल, खानापूरसह इतर तालुक्यांमध्ये उपक्रम यशस्वी
बेळगाव : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील कचऱ्याची उचल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला कचरावाहू वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांवर महिला चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची उचल करण्यासाठी महिला स्व-साहाय्य संघावर जबाबदारी देण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने कचरावाहू वाहनांवर महिला चालकांना नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे 251 महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केली जात आहे. बैलहेंगल तालुक्यात नेसरगी व खानापूर तालुक्यातील नंदगड, लोंढा ग्राम पंचायतीमध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. महिला स्व-साहाय्य संघाच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. त्याबरोबरच महिलांना प्रशिक्षण देण्याचे कार्यही सुरू असल्याचे योजनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









