जी20 बैठकीनिमित्त दोनापावल येथे आयोजन
पणजी : महिला प्रणीत विकास आणि शाश्वत विकासात त्याची महत्त्वाची भूमिका प्रतिबिंबित करणाऱ्या ‘एको’ संकल्पनेवर आधारित प्रदर्शन गोव्यात आयोजित करण्यात आले. दि. 9 ते 11 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विकास कृती गट बैठकी निमित्त महिला आणि बालविकास मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात हातमाग आणि वस्रोद्योगाशी संबंधित जिन्नस, हस्तकला, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने आणि भरड धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ यासारखी पूर्णपणे महिलांच्या संकल्पनेतून आणि रचनांद्वारे तयार करण्यात आलेली उत्पादने मांडण्यात आली होती. यामध्ये महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व तसेच महिला प्रणीत विकास हा लिंग समानता आणि शाश्वत भविष्याचा कशा प्रकारे पाया आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. जागतिक आर्थिक वृद्धीत तसेच शाश्वत विकासाची उद्दिष्टे विशेषत: एसडीजी5 साध्य करण्यात महिलांच्या भूमिकेच्या प्रभावाचे प्रतिबिंब या प्रदर्शनातून पाहायला मिळाले. या प्रदर्शनाच्या इतर काही वैशिष्ट्यांमध्ये खेळणी तयार करणाऱ्या, विणकाम करणाऱ्या, तंत्रज्ञानाची हाताळणी करणाऱ्या महिलांच्या थ्रीडी हॉलोग्रामसह डिजिटल अनुभव, कारागिरांकडून त्यांच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण, पदार्थ चाखण्याची सुविधा असलेला विभाग आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडून प्रकृती तपासणी यांचा समावेश होता. भारतातील विविध राज्यांमधील महिला प्रतिनिधी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, वस्रोद्योग मंत्रालय, अपेडा, चहा मंडळ, मसाले मंडळ, अंबी उद्योगिनी प्रतिष्ठान, उन्नती फाउंडेशन, कल्यशास्त्र, महिला बचत गट, जल सखी, डिजिटल सखी यांसारखे महिला प्रणीत स्टार्टअप त्यात सहभागी झाले होते.









