पंढरपूर, लातूर, तुळजापूरला जाणाऱया प्रवाशांची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
दक्षिण मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नांदेड-हुबळी साप्ताहिक रेल्वेच्या पहिल्याच फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. या एक्स्प्रेसमुळे पंढरपूर, लातूर, तुळजापूर, नांदेड या परिसरात जाणे सोयीचे झाले आहे. पहिल्याच फेरीला 50 ते 55 टक्के प्रवाशांनी बुकिंग करून प्रतिसाद दिल्याची माहिती उपलब्ध झाली असल्याने ही एक्स्प्रेस कायम करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगावमधून नांदेड, लातूर या भागात एकही रेल्वे धावत नाही. त्यामुळे या परिसरात जाणाऱया प्रवाशांना एकतर पंढरपूरपर्यंत पोहचून येथून इतर रेल्वेने या ठिकाणी जावे लागत होते. आता मात्र दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केलेल्या नांदेड-हुबळी साप्ताहिक रेल्वेमुळे प्रवास करणे सोपे झाले आहे. या एक्स्प्रेसच्या एकूण 6 फेऱया होणार आहेत. या एक्स्प्रेसची पहिली फेरी शनिवारी झाली. पहिल्या फेरीला 50 ते 55 टक्के इतके बुकिंग प्रवाशांनी केले होते.
परतीच्या प्रवासावेळी बेळगावमधून पंढरपूरला जाणाऱया प्रवाशांची रेल्वेला गर्दी दिसून आली. बेळगावमधून तुळजापूरला जाण्यासाठीही एस्क्प्रेस महत्त्वाची ठरत असल्याने ही साप्ताहिक रेल्वे कायम करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अद्याप 23 व 30 जुलै रोजी एस्क्प्रेस धावणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.