शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी सुनावणीला हजर
बेळगाव : येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात प्रक्षोभक भाषण केल्याच्या खटल्यात गुरुवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात आरोपींचा जबाब नोंदविण्यात आला. गुरुवारच्या सुनावणीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी हे देखील न्यायालयात उपस्थित होते. विधानसभा निवडणूक काळात 2018 मध्ये आचारसंहिता होती. त्यातच येळ्ळूर कुस्ती मैदानात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह संयोजकांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. संभाजी भिडे गुरुजी, मारुती परशराम कुगजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास मोनाप्पा नंदी, दत्तात्रय गुरुनाथ पाटील, मधू गणपती पाटील, भोला उर्फ नागेंद्र हणमंत पाखरे, किरण गावडे, दुद्दाप्पा चांगाप्पा बागेवाडी, लक्ष्मीकांत नारायण मोदगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यापैकी मारुती कुगजी हे मयत झाले आहेत. त्यामुळे 9 जणांविरोधात खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी सदर खटल्याची सुनावणी होती. सुनावणीला भिडे गुरुजी यांच्यासह उपस्थित सर्व आरोपींचा जबाब नोंदविण्यात आला. 18 एप्रिल रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी युक्तिवाद केला जाणार आहे. आरोपींतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर काम पहात आहेत.









