दोन दिवसांत 156 बस धावल्या : यल्लम्मा-जोतिबा मार्गावर जादा बस
बेळगाव : नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती आणि कोल्हापूर जोतिबा मार्गावर सोडण्यात आलेल्या बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये तब्बल 156 बसेस धावल्या आहेत. यामध्ये सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी 127 बसेस धावल्या आहेत. त्यामुळे परिवहनला नवरात्रोत्सवातून अधिक उत्पन्नाची आशा निर्माण झाली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात सौंदत्ती येथील यल्लम्मा आणि कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी जोतिबा दर्शनासाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 5 वाजता या बसेस धावत आहेत. रविवारी वाडी रत्नागिरी जोतिबासाठी 20 बस धावल्या होत्या. तर सोमवारी 9 बसेस मार्गस्थ झाल्या. बेळगाव-जोतिबासाठी 200 रुपये तिकीट तर लहानांसाठी 100 रुपये तिकीट दर आकारणी केली जात आहे. तर सौंदत्ती यल्लम्मासाठी 120 रुपये तर लहानांसाठी 60 रुपये तिकीट दर आहे. यामध्ये सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला जाणाऱ्या महिलांना शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास दिला जात आहे.
आगाऊ तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध
नवरात्रोत्सव काळात मंदिरांना भेट देऊन देवदेवतांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. विशेषत: सौंदत्ती यल्लम्मा आणि वाडी रत्नागिरी जोतिबाला जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. यासाठी परिवहनने दोन्ही मार्गांवर यात्रा विशेष बस सुरू केली आहे. या नॉनस्टॉप बससेवेलाही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. ही यात्रा विशेष बस 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 5 पासून ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. शिवाय दुपारनंतर परतीच्या प्रवासासाठी बसेस बेळगावकडे धावू लागल्या आहेत. यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आगाऊ तिकीट बुकिंग सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे.