अॅङ राजू मंगेशकर यांचे प्रतिपादन, : शिक्षा सदन विद्यालयात शिष्यवृत्ती प्रदान
म्हार्दोळ : आपण जीवनात यशाचे कितीही मोठे शिखर गाठले, तरी ज्या गुरुजनांमुळे आपण घडलो, आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळाली, त्यांचा विसर कधीच पडू देता कामा नये. आई वडिलां इतकेच किंबहूना कणभर जास्तच ते आमच्या यशस्वी जीवनाचे शिल्पकार असतात. तेव्हा सदैव त्यांचा आदर करा. असे प्रतिपादन शिक्षा सदन शाळेचे माजी विद्यार्थी कामगार संघटक आणि भारतीय तायक्वांडो फेडरेशनचे सरचिटणीस अॅड. राजू मंगेशकर यांनी केले. नगर प्रियोळ येथील शिक्षा सदन विद्यालयात शालांत परिक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. शाळेतील विद्यार्थ्यांना तायक्वांडो खेळाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून आपण नक्की प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी व्यासपीठावर सेंत्रो एदुकादोर सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार कामत, सचिव संजय प्रियोळकर, सभासद निलेश नागवेकर, निवृत्त वैज्ञानिक ए.ए. फर्नांडिस, जेष्ठ शिक्षक उल्हास नाईक, प्रशांत प्रियोळकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, मुख्याध्यापिका शोभा प्रियोळकर, उषा नाईक उपस्थित होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल सर्व मान्यवरांनी मुलांचे अन् शिक्षकांचे कौतुक केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते भेटवस्तू अन् फुल देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त वैज्ञानिक ए.ए. फर्नांडिसतर्फे आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत केलेली शिष्यवृत्ती आणि निवृत्त शिक्षक प्रशांत प्रियोळकर यांनी शैक्षणिक वर्षात प्रथम दोन क्रमाकांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत केलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षिका मोक्षदा गावडे, उमा प्रभूगांवकर, शलका पावसे, अलिशा गोवेकर यांनी वेगवेगळ्या पुरस्कारांचे वाचन केले. सुचिता सतरकर यांनी पाहुण्यांचा परिचय व पुष्पगुच्छ प्रदान केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सोनिया बोरकर तर मुग्धा जोशी यांनी आभार प्रकटन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास मुख्याध्यापिका शोभा प्रियोळकर तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.









