कामगार खात्याचे अधिकारी अमरेंद्र यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध शासकीय सुविधा ठप्प झाल्याने कामगारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. विवाहाचा निधी, पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही थांबली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तातडीने बांधकाम कामगारांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कामगार खात्याचे अधिकारी अमरेंद्र यांना देण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला जात आहे. मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे कामगारांना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. कामगारांच्या मुलांना मिळणारा विवाहाचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप कामगारांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्याबरोबर विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीही ठप्प झाली आहे.
60 वर्षांवरील कामगारांना नवीन पेन्शनसाठी अर्ज स्वीकारण्यास विलंब
शिवाय बांधकाम कामगारांना तुटपुंजा वैद्यकीय निधी दिला जात आहे. त्यामुळे कामगारांना आरोग्याच्या सुविधांमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. 60 वर्षांवरील कामगारांना नवीन पेन्शनसाठी अर्ज स्वीकारण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे वयोवृद्ध कामगारांना पेन्शनपासून दूर रहावे लागले. या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, सुनील गावडे, अजित मजुकर, संतोष माळी, सागर गोरल यांच्यासह कामगार उपस्थित होते.









