‘एक पावल एकचारा’ची जाहीर सभा : द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा ठराव
मडगाव : आपला गोवा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच धार्मिक सौहार्दासाठी जगभर प्रसिद्ध आहे. विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धार्मिक परंपरांचा आदर करतात. मात्र, अलिकडे काही स्वार्थी लोक आपल्या स्वार्थासाठी धर्मांमध्ये द्वेष निर्माण करून गोव्याच्या या भक्कम समाजरचनेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्यातील सार्वजनिक जीवनातील जबाबदार लोक अशा वेळी एकत्र येतात आणि आपली धार्मिक एकात्मतेची समृद्ध परंपरा जपण्याचा संकल्प करतात. काल मडगावच्या लोहिया मैदानावर झालेल्या ‘गोंयकार : एक पावल एकचाराचें’च्या जाहीर सभेत तसा संकल्प करण्यात आला. या जाहीर सभेत पुढील प्रमाणे ठराव घेण्यात आले : 2 ऑक्टोबर 2023 रोजी मडगावच्या या ऐतिहासिक लोहिया मैदानावर ज्योत पेटवून जनजागृतीचा प्रवास सुरू केला होता. काल 31 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी त्याच ठिकाणी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आम्ही गोवेकर एकतेचा मजबूत पाया कायम ठेवण्याचा संकल्प करतो. परकीय राजवटीच्या काळात विविध धर्मांमध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले. आमच्या वडीलधाऱ्यांनी त्या काळातही बंधुभाव जपला. गोवा मुक्तीनंतर झालेल्या गोव्यातील भूमी, भाषा आणि लोकांसाठीच्या प्रत्येक आंदोलनात सर्व धर्माचे लोक एकत्र आल्यानेच आम्ही आपला गोवा समृद्ध ठेवू शकलो. भविष्यात आपण संघटित राहूनच आपले जीवन उजळवू शकतो.
धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
या संदर्भात गोवा सरकारला नम्र विनंती करतो की, धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणताही गाजावाजा न करता कठोर कारवाई करावी. तऊण पिढीमध्ये बंधुभाव निर्माण करण्याच्यादृष्टीने आपल्या मजबूत ऐक्मयाचे प्रतीक असलेल्या घटनांचाही अभ्यासक्रमात समावेश असावा. गोव्यातील विविध धर्मांच्या पूज्य गुरूंना आणि धार्मिक संघटनांच्या नेत्यांनाही आम्ही नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या धार्मिक अनुयायांमध्ये एकतेचे तत्त्व पाळण्याचे आवाहन करावे. म्हणून आज, 31 ऑक्टोबर 2023, एकता दिनानिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राम मनोहर लोहिया, इंदिरा गांधी यांच्या समतेच्या तत्त्वांचे सदैव पालन करू आणि आपल्यात फूट पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना सत्याने विरोध करू, अशी शपथ घेतो.
सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका
या सभेचे प्रमुख वक्ते असलेले ज्येष्ठ साहित्यिक अॅड. उदय भेंब्रे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीच केलेले नाही. राष्ट्रीय सेवक संघाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. भारतीय जनता पार्टी ही आरएसएसची राजकीय शाखा, विश्व हिंदू परिषद ही आरएसएसची धार्मिक शाखा, बजरंग दलसुद्धा आरएसएसची एक शाखा आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आरएसएसची विद्यार्थी शाखा. या सर्व शाखा ‘भारत हिंदू राष्ट्र’ करण्यासाठी वावरत असल्याचे अॅड. उदय भेंब्रे म्हणाले.
‘श्री राम’ कोणत्याही पक्षाची मक्तेदारी होऊ शकत नाही
‘श्री राम’ कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत. त्यांचा राजकीय वापर करू नये असे अनंत अग्नी यावेळी म्हणाले. शिरगांवची श्री लईराई आणि म्हापसेची श्री मिलाग्रीन सायबीण या एकमेकांच्या बहिणी आहेत. सुर्ला दरग्यावर हिंदू बांधव शिगमोत्सवात नमन घालतात. हा एकोपा गोवा सोडून इतरत्र कुठेच सापडत नाही आणि हाच एकोपा आम्हाला जतन केला पाहिजे असे ते पुढे म्हणाले. सभेत राजन घाटे, संजय नाईक, मेश्यू डिकॉस्ता, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, आदित्य देसाई, पार्वती नागवेकर, मारियांव फेर्राव, विकास भगत, शंकर पोलजी, रूपेश वेळीप, रामा काणकोणकर व प्रशांत नाईक यांनी आपले विचार मांडले. सभेला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आमदार कार्लुस परेरा, आमदार एल्टोन डिकॉस्ता, आमदार व्हॅन्झी वियेगस, आमदार व्रुझ सिल्वा व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.









