नोकर संघाची मागणी : कर्मचारी गेल्या दोन–तीन वर्षांपासून वेतनापासून वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मासिक वेतन सुरळीत करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघ (सीआयटीयु) बेळगाव जिल्हा समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पंचायतीकडे दिले आहे.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाहने देण्यात आली आहेत. शिवाय या वाहनांवर चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन घनकचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे. मात्र, स्वच्छता कर्मचारी आणि वाहनचालकांना वेतनापासून दूर रहावे लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर उदरनिवा?चा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दोन–तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.
प्रशिक्षण घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय
काही ग्रामपंचायतींमध्ये कचरावाहू वाहनांवर अद्याप महिला कर्मचाऱ्यांना वाहक म्हणून नेमणूक केलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांना नोकरीपासून दूर रहावे लागले आहे. तर काही ग्राम पंचायत कायेत्रामध्ये स्वच्छतावाहू वाहनावरील कर्मचारी आणि वाहकांनाही कमी करण्यात आले आहे. हावेरी जिल्ह्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून स्वच्छता कर्मचारी आणि वाहकांना वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातही वेतन देण्यात यावे, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.









