ग्रामीण कुली संघटनेची जि. पं. सीईओंकडे मागणी : 9 महिन्यात केवळ 50 दिवसच काम : प्रोत्साहन धनही नाही
बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना वर्षाला 100 दिवस काम देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्राम पंचायतीने 9 महिन्यात केवळ 50 दिवस काम दिले आहे. उर्वरीत तीन महिन्यात 50 दिवस काम कशा पद्धतीने देणार, त्याचबरोबर कामगारांना अद्यापपर्यंत प्रोत्साहन धन दिले नाही. कमी पगारात जड कामे दिली जात आहेत. अशा विविध तक्रारींचा पाढा ग्रामीण कुली कामगार संघटनेतर्फे जि. पं. चे सीईओ राहुल शिंदे यांच्यासमोर बुधवारी वाचला.
सरकारच्या सूचनेनुसार प्रति कुटुंबातील कामगारांना रोजगार हमी योजनेंतर्गत वर्षभरात 100 दिवस काम देणे जरुरीचे आहे. मात्र विविध ग्राम पंचायतींकडून 9 महिन्यात आतापर्यंत केवळ 50 दिवस काम दिले आहे. वर्ष पूर्ण होण्यास चार महिने बाकी आहेत. या कालावधीत 50 दिवस काम कशा पद्धतीने देणार, अशी विचारणा करण्यात आली. महिला कामगारांना चार, तर पुरुष कामगारांना 5 टक्के प्रोत्साहन धन दिले पाहिजे. मात्र अद्यापही ही रक्कम देण्यात आलेली नाही. यासाठी नवीन अॅप येणार असल्याचे कारण सांगितले जात आहे.
कमी पगारात जड कामे देत असल्याचा आरोप
कमी पगारात जड कामे दिली जात आहेत. यामुळे कामगार रोजगाराच्या कामांना येऊ नयेत, असा हेतू असल्याची शंका आहे. यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील वन भागात झाडे लावण्यासह खोदकाम करण्याची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत.
तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन
या सर्व प्रकारामुळे जिल्हा पंचायतीने लक्ष घालून रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी निवेदनाचा स्वीकार करून तातडीने यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.









