आमदार विठ्ठल हलगेकर यांचे आश्वासन : समस्यांची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींची दखल
खानापूर : खानापूर येथील मारुतीनगरमधील समस्या सोडवण्यासंदर्भात नागरिकांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना प्रत्यक्ष भेटून समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती केली होती. यानुसार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मारुतीनगर येथील सहाव्या गल्लीतील समस्यांची पाहणी केली. आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि आपण आपल्या आमदार निधीतून गटार, रस्ता तसेच पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मारुतीनगर येथील सहावी गल्ली परिसरातील गेल्या वीस वर्षापासून समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी वारंवार नगरपंचायतीकडे अर्जविनंत्या केल्या होत्या. तसेच या ठिकाणी रस्त्याची सोय नसल्याने रस्ताही करून देण्याची मागणी केली होती. मात्र याकडे नगरपंचायतीने गेल्या वीस वर्षापासून साफ दुर्लक्ष केले आहे. रात्री, अपरात्री या ठिकाणी येण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने मारुती मंदिराच्या मागून रस्ता करून देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र याकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याच्या ठिकाणीच अनधिकृतपणे घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे मारुतीनगर येथील नागरिकांना सोयीचा रस्ता नसल्याने कुप्पटगिरी रस्त्यावरुन मारुतीनगरात प्रवेश करावा लागत असल्याने सहाव्या गल्लीतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाण्यासाठीही हाल सोसावे लागत आहेत.
या ठिकाणच्या कूपनलिकेच्या दुरुस्तीच्या कारणास्तव वर्षभरापासून काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने कूपनलिकेतील मोटारच नादुरुस्त झाली आहे. याकडे नगरपंचायतीने वर्षभरात फिरकूनही बघितलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी गटार नसल्याने सांडपाण्याचा आणि पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मारुतीनगर वसाहतीत उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या गेलेल्या आहेत. त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. यासाठी उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या दुसरीकडून घालून धोका टाळावा, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्मिता कोळींद्रेकर, सचिन रेमाणी, सुनील गुरव, यल्लाप्पा गुरव, श्रीमंत वाघमारे, यासीन सकली, अब्बास सय्यद, रमजान सनदी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेस्कॉम अधिकाऱ्यांना त्वरित केल्या सूचना
या सर्व समस्यांचा नागरिकांनी पाढाच वाचून प्रत्यक्ष आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. याबाबत आमदारांनी हेस्कॉमचे अधिकारी जगदीश मोहीते यांच्याशी संपर्क साधून तातडीने याबाबत नियोजन करावे, अशी सूचना केली. तसेच आपल्या आमदार निधीतून पावसाळ्यापूर्वी या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे. यामुळे मारुतीनगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









