लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची महापौरांकडे मागणी
बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, 27 ऑगस्टपासून गणेशचतुर्थीला सुरुवात होणार आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर बेळगावात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते, विसर्जन तलाव, पथदीप व इतर आवश्यक कामे मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ यांच्यावतीने महापौर मंगेश पवार यांना देण्यात आले. गणेशचतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक श्रीमूर्ती कपिलेश्वर देवस्थानाजवळील तलावात, विहिरीत व जक्कीन होंडा येथे विसर्जित केल्या जातात. त्यामुळे या सर्व तलाव व विहिरींची सफाई करावी. पावसामुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्यात यावेत. बेळगावला स्मार्टसिटी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात यावे.
विसर्जन मार्गावरील फांद्या तोडा
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंडपांना विद्युत रोषणाई केली जाते. त्यावेळी वीजतारांबाबत खबरदारी घेण्यात यावी. गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक उपाय करण्यात यावेत. देखावे त्याचबरोबर गणेशमूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करतात. त्यामुळे आवश्यक सुरक्षा व्यवस्था, विशेष करून महिलांची काळजी घ्यावी. विसर्जन मार्गावरील फांद्या तोडण्याबाबत खात्याला सूचना करावी.
रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्या
या काळात विविध साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे विविध दुकानांना मध्यरात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. महिलांची संख्या अधिक असल्यामुळे अतिरिक्त महिला पोलिसांची नियुक्ती करावी. विसर्जनादिवशी गणेशभक्तांना विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गॅलरीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर नगरसेवक गिरीश धोंगडी, विजय जाधव, हेमंत हावळ, राजू खटावकर, सौरभ सावंत, रोहित रावळ, अरुण पाटील, आदित्य पाटील, इंद्रजित पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.









