बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी शुक्रवारी आपचे बाणावलीचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगश यांची भेट घेऊन त्यांना योजनेनुसार आणि यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी नोकऱया मिळवून देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी आमदार व्हिएगस यांनी नोंदणीकृत असलेल्या सुमारे 170 स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकऱयांचा प्रश्न निकालात काढावा व त्यांना नववर्षाची भेट द्यावी, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशनात सदर प्रश्न चर्चेस आला असता डिसेंबर, 2022 पर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित सर्व मुलांना आधी 50 टक्के व नंतर 50 टक्के असे करून नोकऱया देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. मात्र त्यानंतर त्यासंदर्भात कोणतीही कृती न झाल्याचे आमदार व्हिएगस यांची भेट घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याने नजरेस आणून दिले.
यावेळी आमदार व्हिएगस यांनी सरकारने विधानसभेच्या पटलावर दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावे व पुन्हा हिवाळी अधिवेशनात सदर विषय उपस्थित करण्याची पाळी आमच्यावर आणू नये, अशी मागणी केली. आधीच अधिवेशनात फक्त तीन दिवसांचा कालावधी कामकाजासाठी मिळणार असल्याने याआधी आश्वासन दिलेल्या विषयावर आमचा वेळ खर्ची घालायला लावू नये. त्यामुळे आम्हाला अन्य दुसरे जनहितार्थ महत्त्वाचे विषय मांडता येतील, असे व्हिएगस यावेळी म्हणाले.









