आमदार महेश सावंत यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
न्हावेली /वार्ताहर
सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा केंद्र सरकारच्या’ अमृत भारत स्थानक योजनेत’ समावेश करून सावंतवाडी टर्मिनस प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मातोंड गावचे सुपुत्र माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्दळीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर कोकण रेल्वे टर्मिनस ची आवश्यकता ओळखून आपल्या हस्ते दिनांक 27 जून 2015 रोजी सावंतवाडी कोकण रेल्वे टर्मिनस भूमिपूजन करण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत सावंतवाडी कोकण रेल्वे टर्मिनस प्रलंबित राहिले आहे. या स्थानकावरून हजारो प्रवासी प्रवास करणारे असतात. परंतु अति जलद गाड्या या स्थानकात थांबत नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. ती गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस होणे अत्यावशक आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनात अग्रेसर ठरणारा जिल्हा आहे. देश विदेशातील पर्यटक सिंधुदुर्ग पर्यटनासाठी यायला सुरुवात झाली आहे. पर्यटन व्यवसायाबरोबर येथील स्थानिक व्यवसायिकांचे व्यवसाय चालण्यासाठी कोकण रेल्वेने येणारे प्रवासी गती देणारे आहेत.त्यामुळे केंद्र शासनाने ‘अमृत भारत स्थानक योजना’ सुरू केली आहे.त्या योजनेत सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा समावेश करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच मडगाव गोवा संपर्क क्रांति एक्सप्रेस, त्रिवेंद्रम एक्सप्रेस, एर्णाकुलम एक्सप्रेस,मंगला एक्सप्रेस यासह इतर अति जलद गाड्याना स्थानकात थांबा द्यावा. जेणेकरून या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी लेखी निवेदनातून मागणी आमदार महेश सावंत यांनी केली आहे.









