आरोग्य-शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊल उचलावे. बैठकीला उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह इतर विषयांवर आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, असे स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी झाली. त्यामध्ये अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या. तुरमुरी येथील कामांबाबत कधी निविदा काढण्यात आली? ते काम किती टक्के झाले आहे? याबाबत माहिती घेण्यात आली. एकूण याठिकाणी 15 विविध प्रकारच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामधील दोन कामे पूर्ण झाली आहेत तर सात कामांचे कामकाज सुरू आहे. एकूण 26 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी चार कंत्राटदारांना ते काम दिले गेले आहे, असे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले.
अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेला एकूण निधी किती, त्यामधील किती निधी खर्च करण्यात आला आहे, सध्या किती निधी शिल्लक आहे? याची माहितीही अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. अनुसूचित जाती-जमातीसाठी सर्वसामान्य कुटुंबांसाठी शौचालय बांधण्यासाठी विशेष निधी देण्यात येतो. त्या निधीसाठी किती अर्ज आले आहेत, अर्ज आलेल्या व्यक्तींना निधी देण्यात आला का? याची माहितीही घेण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी दुचाकीसह व्हिलचेअर देण्यात येतात, ते कोणकोणत्या समाजातील नागरिकांना दिले जातात, तसेच देताना कशाप्रकारे अर्ज स्वीकारला जातो, याबाबत माहिती द्यावी, असे सांगण्यात आले. त्यावर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तीन जणांना दुचाकी देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरणही केले जाते. यासाठी 31 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अनुसूचित जाती-जमातीबरोबरच दिव्यांग आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहेत, असे बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवा
सध्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. याचबरोबर अधिवेशनही होणार आहे. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याकडे आरोग्य निरीक्षकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी दिली आहे. बेंगळूर तसेच इतर जिल्ह्यातून अधिकारी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. तेव्हा बेळगाव स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा करू नये, असे देखील सांगण्यात आले.
आयुक्त अनुपस्थित राहिल्याबद्दल चर्चा
आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीला याचबरोबर इतर बैठकींना आयुक्त उपस्थित राहत नाहीत. याबद्दल उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आयुक्त अशोक दुडगुंटी हे एका महत्त्वाच्या बैठकीला गेले आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र याबाबत राज्याच्या नगर विकास प्राधिकरणाकडे तक्रार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
फाईल गायब प्रकरण पुन्हा चिघळणार?
अर्थ, कर स्थायी समितीच्या बैठकीत गंभीर चर्चा
फाईल गायब प्रकरणामध्ये घडलेल्या घडामोडींवरून अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली. महापालिकेचे कायदा सल्लागार यांच्यावर याबाबत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. मात्र कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी याबाबत मी जे काही केले आहे ते कायद्याच्या चौकटीतच केले आहे. याबाबत हवे तर कोणताही निर्णय घेऊ शकता, असे सांगितले. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शुक्रवारी अर्थ व कर स्थायी समितीची बैठक झाली. चेअरमन वीणा श्रीशैल विजापुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी काही नगरसेवकांनी यावर पुन्हा जोरदार आवाज उठविला. कौन्सिल सेक्रेटरींवर आयुक्त फौजदारी गुन्हा दाखल करतात, हे योग्य आहे का? हे कायद्याच्या चौकटीत बसते का? असा प्रश्न सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केला. त्यावर कायदा सल्लागारांनी कायद्याच्या चौकटीमध्ये जे काय आहे ते करण्यात आले आहे. याबाबत अधिक चर्चा करायची असेल तर कौन्सिलमध्ये करू शकता, असे सांगितले. सध्या हे प्रकरण खातेनिहाय चौकशीमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे यावर मी भाष्य करू शकत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. एक तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकता किंवा दिवाणी खटलादेखील दाखल करू शकता, असे सांगितले. मात्र यावरून पुन्हा एकदा जोरदार चर्चा होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी व नगरसेवक उपस्थित होते.









