मान्यवरांच्या हस्ते उद्या भूमिपूजन
वार्ताहर/हिंडलगा
येथील बॉक्साईट रोड (वनखात्याच्या कार्यालयाजवळ) या ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने भव्य स्मृतीभवन बांधण्याचा संकल्प सोडला आहे. सदर स्मृतीभवनाचा सीमाभागातील लोकांना उपयोग व्हावा या उद्देशाने संकल्प सोडला आहे. सदर स्मृतीभवनासाठी अपेक्षित खर्च हा 2 कोटी इतका होणार आहे. 1 जून 1986 च्या कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीविरोधात जे आंदोलन झाले त्यावेळी हिंडलगा, बेळगुंदी या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर जो बेछूट गोळीबार केला त्या गोळीबारात नऊ हुतात्मे झाले व बरेच युवक जखमी झाले. त्यांच्या स्मरणार्थ अल्पमोबदल्यात कै. शंकरराव कुलकर्णी यांनी 11 गुंठे जागा महाराष्ट्र एकीकरण समितीला दिली. त्याच ठिकाणी हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. उर्वरित जागेत स्मृतीभवन बांधले जाणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. 30 मार्च रोजी दुपारी 4 वाजता बॉक्साईट रोड येथे होणार आहे. भूमिपूजन म. ए. समितीचे युवा नेते व सुपरिचीत आर्किटेक इंजिनिअर आर. एम. उर्फ राजू एम. चौगुले यांच्या हस्ते होणार असून हुतात्मा स्मारकाचे पूजन उचगाव येथील उद्योजक व प्रगतशिल शेतकरी बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी सीमाभागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व मराठीप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशाप्रकारचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.









