बेळगाव-हुबळी विमानतळांवर 100 टक्के हरित इंधन वापरण्याचा प्रयत्न
बेळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 2024 पर्यंत देशातील 25 विमानतळांचा हरित इंधनावर वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बेळगाव, हुबळी विमानतळांवर 100 टक्के हरित इंधन वापर करून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सौरऊर्जेचा वापर करून कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, कोचीसह 25 विमानतळांवर 100 टक्के सौरऊर्जेचा वापर करून इंधन बचत करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात बेळगाव, हुबळी, म्हैसूर व गुलबर्गा या विमानतळांवर सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. यापैकी बेळगाव व हुबळी या दोन विमानतळांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून उर्वरित वीज केपीटीसीएलला देण्यात येत आहे. हुबळी येथील विमानतळ परिसरात सुमारे 64 कोटी रुपये खर्च करून 8 मेगावॅट वीजकेंद्र उभारण्यात आले आहे. सध्या वर्षाला 140 लाख युनिट वीज निर्मिती सौरऊर्जेतून केली जात आहे. यासाठी विमानतळाच्या खुल्या जागेत सोलार पॅनल बसविण्यात आले असून, त्याद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. सौरऊर्जेतून निर्माण झालेल्या विजेपैकी हुबळी विमानतळाला लागणारी वीज सोडून इतर केपीटीसीएलला दिली जाते. बेळगाव विमानतळाला गरजेइतका विजेचा पुरवठा हेस्कॉमकडून केला जातो. हुबळी येथे एकाच ठिकाणी सौरपॅनल बसविण्यात आल्याने देखभालीचा खर्चही कमी झाला आहे.
सौरऊर्जेचा वापर करणार
बेळगावसह राज्यातील बहुतांशी विमानतळांवर सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. हुबळी विमानतळ परिसरात सौर ग्रीड बसविण्यात आले असून, त्याद्वारे उत्पादित केलेली वीज केपीटीसीएलला दिली जाते. या करारानुसार बेळगाव विमानतळावर हेस्कॉमकडून वीज दिली जाते.
– राजेशकुमार मौर्य (बेळगाव विमानतळ संचालक)
वर्षाला 8 कोटी रुपयांची बचत
कर्नाटकात विमानतळांचा विस्तार वाढत आहे. विमानतळांच्या टर्मिनलसोबत इतर इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा लागतो. राज्यभरातील विमानतळांचा अंदाज घेतल्यास कोट्यावधी रुपये वीजबिलासाठी खर्च करावे लागतात. प्रत्येक विमानतळावर सौरऊर्जेचा वापर केल्यास अंदाजे 8 कोटी रुपयांची बचत होणार आहे.









