लांजा प्रतिनिधी
तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला यासारख्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव केला असून तशा सूचना सर्व संबंधित दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
दारू, मटका, जुगार त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थ यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यास धोका संभवतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक कलह देखील निर्माण होत असतात. याच अनुषंगाने यापूर्वी साटवली ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा साटवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विक्री यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकानदार, व्यापारी यांना देण्यात आले आहे.








