भारताचे प्रस्तावाच्या बाजूने मतदान : 18 देश मतदानाला अनुपस्थित
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र
इस्रायल-हमास युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनमधील इस्रायली पवित्र्याविरोधात महत्त्वाचा ठराव संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मांडण्यात आला. भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले असून 145 देशांनी समर्थनार्थ मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. पॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल आयलंड, फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया यांच्यासह काही देशांनी विरोधात मतदान केले. त्याचवेळी, 18 देश या मतदानाला अनुपस्थित राहिले.
संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या ठरावात पूर्व जेऊसलेम आणि व्याप्त सीरियन गोलानसह पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलच्या चुकीच्या कृतींवर टीका करण्यात आली होती. पूर्व जेऊसलेम आणि व्यापलेल्या सीरियन गोलानसह पॅलेस्टिनी प्रदेशातील इस्रायली वसाहती’ या शीर्षकाचा हा ठराव संयुक्त राष्ट्रात बहुमताने मंजूर करण्यात आला.
या प्रस्तावापूर्वी जॉर्डनच्यावतीने ऑक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत (युएनएससी) प्रस्ताव मांडला होता. या ठरावात इस्रायल-हमास युद्धात तात्काळ मानवतावादी युद्धबंदीची मागणी करण्यात आली. 120 देशांनी या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले, तर 14 देशांनी विरोधात मतदान केले. 45 देश मतदानाला गैरहजर होते. अशाप्रकारे हा प्रस्ताव मोठ्या फरकाने मंजूर करण्यात आला. त्यावेळी भारताने या प्रस्तावाच्या समर्थनात किंवा विरोधात मतदान केले नाही. भारताचा प्रतिनिधी मतदानापासून दूर राहिला होता.









