अखेर ईश्वरप्पांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
प्रतिनिधी /बेंगळूर
गुरुवारी शिमोग्यात पत्रकार परिषदेत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेल्या के. एस. ईश्वरप्पा यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एका ओळीत लिहिलेले त्यागपत्र दिले आहे. हिंडलग्यातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्याने ईश्वरप्पा यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी शिमोग्यातून भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत बेंगळुरात येत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.
मंत्री के. एस. ईश्वरप्पा कंत्राटी कामांमध्ये 40 टक्के कमिशन मागत असल्याची तक्रार कंत्राटदार संतोष पाटील यांनी पंतप्रधानांकडे केली होती. त्यानंतर त्यांनी मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी उडुपीतील शांभवी लॉजमध्ये आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी संतोष यांनी व्हॉटस्ऍप संदेश प्रसिद्धीमाध्यमांना पाठविला होता. त्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला ग्रामविकासमंत्री ईश्वरप्पाच कारणीभूत आहेत, असा आरोप केला होता.
बेंगळूरला येण्याआधी के. एस. ईश्वरप्पा यांनी सिद्धगंगा मठाला भेट दिली. या प्रकरणात आपण निर्दोषमुक्त होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय आणि राज्य नेते, मंत्री, आमदार, कार्यकर्त्यांची कोंडी होऊ नये, या कारणावरून आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी गुरुवारपासून विधानसौधच्या पूर्व प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले अहोरात्र धरणे आंदोलन समाप्त झाले आहे. मात्र, त्यांनी ईश्वरप्पांच्या अटकेची मागणी केली आहे. ईश्वरप्पांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा सरकारला दिला आहे. सरकार पोलिसांना त्यांचे काम करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
चौथ्या व्यक्तीविषयीही तपास
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात ईश्वरप्पा यांच्यासह तिघांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. आता या प्रकरणात चौथ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. संतोष यांनी लॉजमध्ये दोन रुम घेतल्या होत्या. त्यापैकी एक रुम आपल्या दोन मित्रांना दिली. तर एक रुम स्वतःसाठी घेतली होती. आपल्यासोबत राजेश राहणार असल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले होते. त्यामुळे राजेश हा संतोष यांची भेट घेण्यासाठी लॉजमध्ये आला होता का?, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दीड महिन्यात आरोपमुक्त होईन
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यू प्रकरणात आपल्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी कोण, याचा शोध लागला पाहिजे. ग्रामविकास हे आपल्या अत्यंत आवडीचे खाते आहे. तपासाच्या दृष्टीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दीड महिन्यात आरोपमुक्त होऊन पुन्हा मंत्री बनेन.
– के. एस. ईश्वरप्पा
अटक करावी की नाही, हा निर्णय पोलीस घेतील
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात ईश्वरप्पा आरोपमुक्त होऊन पुन्हा मंत्री बनतील. ईश्वरप्पांना अटक करावी की नाही, हा निर्णय पोलीस अधिकारी घेतील. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य उजेडात येईल. यापूर्वी डीवायएसपी एम. के. गणपती यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालिन मंत्री के. जे. जॉर्ज यांना अटक झाली होती का?
– बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री









