नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱयांनी राजीनामा दिला आहे. या वृत्तवाहिनीची मातृसंस्था न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड या कंपनीचे बव्हंशी समभाग अदानी उद्योगसमूहाकडून विकत घेतले गेल्याने एनडीटीव्हीच्या व्यवस्थापनात परिवर्तन झाले आहे. या वृत्तवाहिनीचे अँकर प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांनीही त्यांच्या समभागांची विक्री अदानी उद्योगसमूहाला केली आहे. त्यामुळे त्यांचे कंपनीवरचे नियंत्रण संपुष्टात आले आहे.
कंपनी आता नव्या व्यवस्थापनाची नियुक्ती करणार असून त्यामुळे कंपनीच्या ध्येय धोरणात परिवर्तन होणार आहे, हे निश्चित मानले जात आहे. जुन्या अध्यक्षा सुपर्णा सिंग आणि धोरणप्रमुख अरिजित चॅटर्जी यांनी शुक्रवारी त्यांचे त्यागपत्र सादर केले आहे. उत्पादन अधिकारी कवलजित सिंग यांनीही पद सोडले आहे.
आपल्या समभागांची अदानी समूहाला विक्री होऊ नये यासाठी एनडीटीव्हीने बरेच प्रयत्न केले होते. कायद्याचे कारण दाखवून समभागांचे हस्तांतरण करण्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, अदानी यांनी खुल्या बाजारातून समभागांची खरेदी केली आहे. नंतर एनडीटीव्हीच्या चालकांनीच त्यांच्या समभागांची विक्री अदानी समूहाला केल्याने अपोआप या कंपनीचा ताबा रॉय यांच्या हातून निसटला होता. आता अदानी हे या कंपनीचे मालक आहेत.









