धमक्यांमुळे निर्णय ः पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी अनेक हिंदू देवतांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली. याबाबत भाजपने आप सरकारवर हल्लाबोल केला होता. या प्रकारानंतर मनुवादी मानसिकतेचे लोक मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावत आहेत. मी पक्षाचा खरा सैनिक आहे. माझ्या समाजाच्या हक्कासाठी मी लढत राहीन. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ द्यायचे नाही, असे स्पष्टीकरण देत राजीनामा सादर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या गुजरात दौऱयावर असून त्यांनी आतापर्यंत या मुद्दय़ावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
5 ऑक्टोबर रोजी गौतम यांनी स्वतः एका धर्मांतराच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. या कार्यक्रमात दहा हजारांहून अधिक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची आणि भारताला जातिवाद व अस्पृश्यतामुक्त करण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले होते. भारतीय जनता पक्षाने या मंत्र्याला काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केली होती. आम आदमी पक्षाचे खरे स्वरुप या घटनेमुळे जनतेसमोर आले अशी टीकाही होत होती. या कार्यक्रमात साधारणतः 10 हजार हिंदूंनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा दावा करण्यात आला होता.
हिंदूंच्या भावना दुखावल्या
या कार्यक्रमात हिंदू देवतांसंबंधी अपमानास्पद विधाने करण्यात आली. हिंदू देवतांना न मानण्याच्या प्रतिज्ञा घेण्यात आल्या. आपचे मंत्री गौतम यांनीही हिंदू देवतांचा अवमान करणारी विधाने केली. हे सर्व चित्रण प्रसारित झाल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते गौतम भाटिया यांनी केला होता. गौतम यांनी कार्यक्रमात केलेली टिप्पणी ही हिंदू धर्माचा तिरस्कार करणारी होती, असेही प्रतिपादन त्यांनी केले.









