वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सरकारकडून अधिसूचना जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. लवकरच लोकसभा निवडणुका होणार असताना अरुण गोयल यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अरुण गोयल यांच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगात दोन पदे रिक्त आहेत. 1985 बॅचचे आयएएस अधिकारी अरुण गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिवपदही भूषवले आहे.









