प्रतिनिधी/ फोंडा
माधव सहकारी व अनुप देसाई या गोवा डेअरीच्या दोघा संचालकांनी दिलेले राजीनामे संचालक मंडळाकडून मंजूर करण्यात आले आहेत. काल बुधवार 15 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यांवर चर्चा होऊन ते स्वीकारले गेल्याची माहिती डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिली.
गेल्या 2 फेब्रुवारी रोजी माधव सहकारी व अनुप देसाई या डेअरीच्या दोघा संचालकांनी पदाचे राजीनामे दिले होते. डबघाईस आलेली डेअरीची आर्थिक स्थिती, मोठ्याप्रमाणात थकलेली देणी व गेल्या सात महिन्यात त्यावर सातत्याने उपाययोजना सुचवूनही संचालक मंडळाकडून त्यावर कुठलीच उपाययोजना होत नसल्याने नाईलाजाने राजीनामे देत असल्याचे अनुप देसाई यांनी सांगितले. माधव सहकारी यांनीही डेअरीच्या एकंदरीत कारभाराबद्दल नाराजी व्यक्त कऊन हा निर्णय घेतलेला आहे.

गेल्या जून महिन्यात संचालक मंडळाच्या बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माधव सहकारी व अनुप देसाई हे निवडून आले होते. अवघ्या सात महिन्यातच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. अनुप देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना डबघाईस आलेला डेअरीचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी आपण गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने उपययोजना सूचवित आहे. मात्र संचालक मंडळाकडून दूध दरवाढी पलीकडे इतर कुठलेच ठोस निर्णय घेण्याचे गांभीर्य दाखविले गेले नाही. नवीन संचालक मंडळाने 18 जुलै 2022 रोजी ताबा घेतला होता. या सात महिन्यामध्ये डेअरीची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच खालावत चालली आहे. डेअरीला डबघाईस नेण्यासाठी मुख्य कारण ठरलेला पशुखाद्य प्रकल्प काही काळासाठी बंद करावा व तो एखाद्या खासगी आस्थापनाकडे ठराविक काळासाठी कंत्राटी पद्धतीवर सुपुर्द करावा, असा आपला प्रस्ताव होता. सध्या पशुखाद्य प्रकल्पावर महिन्याकाठी ऊ. 30 ते 35 लाख तोटा सोसावा लागत आहे. डेअरीला कच्चा माल पुरविणाऱ्या कंत्राटदारांची थकीत बिले चुकती करण्यात आलेली नाहीत. मार्केटींग विभागात सुधारणा तसेच अन्य काही उपाययोजना संचालक मंडळाच्या बैठकीत मांडूनही त्याबाबत कुठलाच निर्णय होत नाही. डेअरीत सुधारणा होत नसल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा राजीनामा देणे योग्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.









