प्रतिनिधी/ म्हापसा
पक्षाने सांगितले तर आपल्यास पायउतार व्हावेच लागणार आहे कारण तो पक्षाचा आदेश आहे. मला याबाबत कुणीही फोन केला नाही वा सांगितले नाही. तो नंतरचा प्रश्न आहे. म्हापशात सर्व काही सुरळीत चालले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पायउतार होण्यास सांगितल्यास त्यावर विचार करू, अशी माहिती म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगराध्यक्षपदावरून आमदारांनी पायउतार होण्यास लावले का? असा प्रश्न नगराध्यक्षांना केला असता त्यांनी वरील माहिती दिली.
आमदारांच्या सहकार्यानेच सर्व विकासकामे
त्या म्हणाल्या म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या कृपेनेच आमचे पॅनल आहे. आपल्यास त्यांनी पायउतार व्हा असे कधीच सांगितले नाही. सध्या वृत्तपत्रात येणाऱया बातम्या कोण देतो हे आपल्यास माहीत नाही. मात्र आपल्यास मुख्यमंत्र्याचा फोन येणार एवढेच सांगितले आहे. म्हापशाचा आज इतका विकास झाला आहे तो आमदारांच्या सहकार्यानेच झालेला आहे. आमदार आमच्याबरोबरच आहे.
नगराध्यक्षपदाच्या कालावधीचा करार होता व तो संपुष्टात आल्याने तुम्हाला पायउतार व्हायला लावले आहे असा प्रश्न नगराध्यक्षांना विचारला असता असा कोणताही करार झालेला नाही असे नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी स्पष्ट केले. आपल्यास तसा काहीच आदेश आलेला नाही. या सर्व अफवा पसरविल्या जात आहे असे त्या म्हणाल्या.









