आरजीपीचे आठ बंडखोर आमदारांना आव्हान : आझाद मैदानावर काँग्रेस-भाजपविरुद्ध निदर्शने
प्रतिनिधी /पणजी
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराचा पणजीतील आझाद मैदानावर काल रविवारी निदर्शने करुन जोरदार निषेध नोंदवला. सर्व आठ आमदारांना राजीनामे देऊन भाजपा उमेदवारीवर पुन्हा निवडून येऊन दाखवण्याचे आव्हान दिले आहे. हे आव्हान आता ते आमदार स्विकारतात की फेटाळतात हे पहावे लागेल.
पक्षाचे प्रमुख मनोज परब तसेच पक्षाचे सांतआद्रे मतदारसंघाचे आमदार वीरेश बोरकर यांनी सदर बंडखोरीवरुन काँग्रेस – भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप-काँग्रेस यांची अंतर्गत छुपी युती असून काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठीच भाजपने लोबो यांना काँग्रेस पक्षात पाठवले होते. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याबरोबरच विश्वजित राणे यांच्याकडे सेटींग केले, असा उघड आरोप केला. म्हणूनच राणे यांनी लोबोंच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही, असा ठपका परब व बोरकर यांनी ठेवला आहे.
काँग्रेसच्या फुटीर आमदारांनी जनतेकडे व देवाकडे विश्वासघात केला. त्यांनाही फसवले व काँग्रेस नेत्यांच्या आरोपानुसार भाजपकडून कोटय़वधी रुपये उकळून पक्षांतर केले. त्यांची कृती लजास्पद असून काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत हे आमचे म्हणणे तंतोतत खरे ठरले असा दावा परब व बोरकर यांनी केला.
सर्वच काँग्रेस नेते बंडखोरीत सामील
विरोधी पक्षनेते मायकल लोबो व दिगंबर कामत यांच्यावर कारवाई करतो म्हणून काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी घोषणाबाजी केली. परंतु प्रत्यक्षात ते काहीच कारवाई करु शकले नाहीत, कोणतीच कारवाई झाली नाही कारण सर्वच काँग्रेस नेते बंडखोरीत सामील असल्याची टीका आरजीपीने केली आहे. यावेळी रोहन कळंगूटकर, विश्वेश गावडे, मनिषा शिरोडकर, गौरेश आगरवाडेकर, सांतान तसेच इतरांची सरकारविरोधी भाषणे झाली.
मोठय़ा प्रकल्पातील वाटा मिळावा म्हणून बंडखोरी
गोव्यात मोठमोठे प्रकल्प येणार आहेत. त्यातील वाटा ‘खायला’ मिळावा म्हणून त्या आठ आमदारांनी बंडखोरी केली असून हिमंत असल्यास त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी. देव आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आता जनतेपुढे आरजीपी हा एकमेव पर्याय असून जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. या धरणे, निदर्शने आंदोलनात पक्षाच्या कार्यकत्यांनी भाग घेतला होता.









