भोवताल परिसरात दुर्गंधी : संजय बर्डेची आरोग्य खात्यात लेखी तक्रार

प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा बोडगेश्वर मंदिरासमोर रस्त्याला लागून असलेल्या बोशन डेव्हलोपर्सच्या इमारतीचे शौचालयाचे पाणी रस्त्यावर सोडल्याने या बाजूला दुर्गंधी पसरली असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती म्हापशातील नागरिकांनी वर्तविली असून हे सांडपाणी त्वरित बंद करावे अशी लेखी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता संजय बर्डे यांनी म्हापसा आरोग्य अधिकाऱयांकडे केली असून याच्या प्रती म्हापसा पालिकेलाही देण्यात आल्या आहे. या वृत्ताची दखल घेत म्हापशाच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी मुख्याधिकाऱयांना व पालिका निरीक्षकांना याची त्वरित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर कारवाई करावी अशी मागणी श्री. बर्डे यांनी केली आहे.
म्हापसा जुने नवतारा हॉटेल समोरच असलेल्या या बोशन होम मधील शौचालयाच्या टाक्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. यामुळे मलःनिस्सारणाचे पाणी गटाराच्या आधाराने रस्त्यावर सोडले जात आहे. म्हापसा-कळंगूट रस्त्यानजिक हे सर्व शौचालयाचे पाणी अडकून राहत असल्याने या बाजूने ये-जा करणाऱया वाहनाने हे पाणी उसळून सर्वत्र पसरते. शिवाय ये-जा करणाऱया वाहनावर तसेच पादचाऱयांवर हे पाणी उसळत असल्याचे दिसून येत आहे. येथील गटारे सर्वत्र उघडी असून दुर्गंधीमुळे ये-जा करणाऱयांना याचा बराच त्रास होतो. येथे मोठे डास पैदासही झाले असून डेंग्यू वा मलेरिया सारख्या रोगाची लागण होण्याची भीती येथील रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला त्रास होईल या उद्देशाने येथील रहिवासी मालक विरोधात बोलण्यास पुढे येत नाही अशी माहिती येथील रहिवासीयांनी दिली.
यावर त्वरित कारवाई करा- संजय बर्डे

दरम्यान याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ता संजय बर्डे म्हणाले की, या बोशन होममध्ये महनीय व्यक्ती राहतात मात्र या इमारतीच्या मालकांनी सर्व शौचालयाचे पाणी गटारातून मुख्य रस्त्यावर सोडलेले आहे. हे मालक जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. हे पाणी खुलेआम गटारातून रस्त्यावर पहायला मिळते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास रोगराई होऊ शकते. आपण याबाबत आरोग्य खाते व पालिकेला तक्रार दिली आहे. अशा बिल्डर्सना नाहरकत देताना विचार करावा. यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे असे बर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.









