बत्ती गुलमुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा
सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपसा करण्यात येणाऱ्या दोन ठिकाणी वीज पुरवठा तब्बल ८ ते ९ तास खंडित राहिल्याने पाणीपुरवठा उपसा प्रक्रिया बंद होती. परिणामी शहराचा पाणीपुरवठा एका रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे जाणार आहे. यामुळेच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पुढील आठवडाभरासाठी विस्कळीत होणार आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या सोरेगांव जलशुध्दीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५: ३० ते दुपारी १: १५ पर्यंत खंडित झाला होता तर पाकणी जलशुध्दीकरण केंद्रास होणारा विद्युत पुरवठा सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२: १० ते रात्री ९: ३० वाजेपर्यंत खंडित झाला होता.
यामुळे सोलापूर शहर पाणी पुरवठ्यासाठी टाकळी पंप हाऊसवरुन सुमारे ८ तास व उजनी पंप हाऊसवरुन सुमारे ९ तास पाण्याचा उपसा होवू शकला नाही. या कारणामुळे १३ ऑक्टोबर रोजीचा नियोजित पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. दोन्ही कारणामुळे संपूर्ण शहराचा १४ ऑक्टोबरपासूनचा नियोजित पाणी पुरवठा एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाणार आहे.
शहरातील नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेस सहकार्य करावे. सोलापूर– उजनी दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन शहराला आता अधिक पाणी मिळत असल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरातील काही भागांमध्ये तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर शहरातील काही भागांसह हद्दवाढ भागांमधील पाणीपुरवठा हा पाच दिवसाआडच ठेवण्यात आला आहे. यामुळे शहरातील त्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना फारसा फरक पडणार नाही. पण हद्दवाढ भागाला मात्र आता आठवड्यानंतर पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांची त्रेधातिरपट उडणार आहे.








