अत्याधुनिक सुविधा पुरविणार : नागरिक-पालकांनी व्यक्त केला बैठकीत निर्धार : अनेकांकडून शाळेसाठी देणगी
खानापूर : ‘सर्वांच्या उत्तम सहकार्यामुळे 28 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली शिवाजीनगर येथील मराठी प्राथमिक शाळा आम्ही बंद पाडू देणार नाही. अत्याधुनिक सुविधा पुरवून शाळा म्हणजे एक आदर्श केंद्र निर्माण करणार’ असा निर्धार येथील नागरिक आणि पालकांनी व्यक्त केला. येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या समुदाय भवनमध्ये खास शाळेसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. निवृत्त प्राचार्य पत्रकार पी. के. चापगावकर अध्यक्षस्थानी होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री गणेश मंडळाचे उपाध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य राजू यळळूरकर व शाळा सुधारणा समिती अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी मुख्याध्यापक एस. जी. शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत शाळेच्या वाटचालीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. ‘शाळेचे अनेक विद्यार्थी उच्चविद्याविभुषित झाले आहेत. त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावरसुद्धा माणूस वरिष्ठ पातळीवर पोहचू शकतो, यासाठी मराठी शाळा बंद पडू नये, असा आपण संकल्प करुया’ असे ते म्हणाले.
म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, तालुक्मयात काही शाळा बंद पडलेल्या आहेत. त्या दृष्टीने शाळा बंद पडू नये म्हणून अगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून पालकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. हा शिवाजीनगरवासियांचा प्रयत्न स्तुत्य व अनुकरणीय आहे. इतर गावातील पालकांनीसुद्धा याचे अनुकरण करून शाळा बंद पडू नयेत, यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही समितीच्यावतीने सर्वांना सहकार्य करू, असे अभिवचन दिले. आबासाहेब दळवी म्हणाले, मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. वरिष्ठ पातळीपर्यंत याबाबत प्रयत्न सुरू असून तालुक्यातील एकही मराठी शाळा बंद पडू नयेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया. निरंजन देसाई म्हणाले, गोरगरीब विद्यार्थी व पालकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या आर्थिक समस्या सुटल्या तर आपोआप हे विद्यार्थी शाळेला नियमित येतील. यासाठी ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या नावे आर्थिक मदत करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून निश्चितच सुरुवात केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच मराठी शिक्षणाबरोबर पहिलीपासून इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करावा. शिवाजी चोपडे, गोपाळराव देसाई यांनी आपल्या देणगीचा पहिला हप्ता देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला. परशुराम पाटील व विनोद कदम यांनी एक संगणक, जानबा वारके यांनी ग्रीनबोर्ड, गंगाधर पाटील यांनी वॉटर फिल्टर भेटीदाखल दिला. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व मराठी भाषा सुधारावी, यासाठी या शाळेचे वाचनालय सुसज्ज करू, असे शिंदे यांनी सांगितले. विश्वास घाटगे, राजाराम देसाई, जी. एम. धबाले, महादेव मादार, शंकर गुरव, डॉ. डी. ए. पै, ए. आर. मुतगेकर, दत्ता गावडे व नागरिक उपस्थित होते.सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. एच. गुरव यांनी आभार मानले









