भिंत बांधून रस्ता बंद केल्याने चौकशीचे दिले आदेश
बेळगाव ; वडगाव मंगाईनगर येथील नागरिकांना रस्त्याची समस्या भेडसावत आहे. सिडीपीप्रमाणे असलेला रस्ता काँक्रिटची भिंत बांधून बंद करण्यात आला आहे. यामुळे मंगाईनगर येथील नागरिकांना रस्ता उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. या विरोधात मंगाईनगर रहिवासी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेण्यात आली. मंगाईनगर परिसरात 500 हून अधिक कुटुंबे आहेत. या नागरिकांना येण्या जाण्यासाठी मंगाई मंदिर शेजारून रस्ता उपलब्ध होता. परंतु हा रस्ता दोन दिवसांपूर्वी काँक्रिटची भिंत घालून बंद करण्याचा प्रकार घडला आहे. याविरोधात येथील नागरिक संतापले असून त्यांनी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन यांच्याकडे दाद मागितली होती. मंगळवारी त्यांनी जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली तक्रार मांडली. सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून चौकशीचे आदेश दिले आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, श्रीधर बिर्जे, किरण पाटील, प्रशांत हणगोजी, सनी रेमाणाचे यासह इतर उपस्थित होते.









