चुकीच्या जोडणीमुळे उच्चदाब : घरगुती-व्यावसायिक उपकरणांचे नुकसान
बेळगाव : हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका अनगोळ येथील नागरिकांना बसला. दुरुस्तीवेळी चुकीच्या पद्धतीने वीजवाहिन्या जोडल्याने उच्चविद्युतभारामुळे (हायव्होल्टेज) चौथे रेल्वेगेट परिसरातील दुकाने, तसेच घरांमधील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच हेस्कॉमने नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. रविवारी दुपारी अनगोळ चौथे रेल्वेगेट परिसरातील वीजपुरवठा काही कारणाने खंडित झाला. त्यामुळे स्थानिकांनी हेस्कॉमकडे तक्रार दाखल केली. दुरुस्तीसाठी दोन नवीन लाईनमन पाठविण्यात आले होते.
परंतु, त्यांनी दुरुस्तीवेळी चुकीच्या पद्धतीने वीजवाहिन्या जोडल्याने उच्चविद्युत प्रवाहाच्या परिणामाने विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. बरीचशी महागडी उपकरणे निकामी झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. परिसरातील घरांसोबतच हॉटेल, कार्यालये यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. टीव्ही, फ्रीज, फॅन, वॉशिंग मशीन, सीसीटीव्हींसाठीची यंत्रणा, यासह इतर उपकरणे जळून निकामी झाली. यामध्ये नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. सोमवारी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ नुकसानभरपाईची मागणी केली.
हेस्कॉमने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी
हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अनगोळमधील नागरिकांना आर्थिक फटका बसला. चुकीच्या पद्धतीने जोडणी देण्यात आल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच उपकरणांचे नुकसान झाले. त्यामुळे हेस्कॉमने तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर याची एक प्रत सर्व विभागांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
– विनायक गुंजटकर (माजी नगरसेवक)









