महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी मंगळवारी ईद-उल-अधा किंवा बकरी ईदच्या आधी सोसायटीमध्ये दोन बोकड आणल्याबद्दल आक्षेप घेऊन मुस्लिम कुटुबाला विरोध केला. या प्रकारानंतर पोलिसांनी बुधवारी 11 जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बकरीच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी ही बकरी आणल्याचा आऱोप रहिवाशांनी केला होता.
ही घटना मीरा रोडवरील जेपी नॉर्थ येथील विनयनगर सोसायटीमध्ये घडली आहे. या घटनेनंतर मंगळवारी हौसिंग सोसायटीचे सभासद आंदोलनासाठी सोसायटी जमल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधिकाऱ्यांनी रहिवाशांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मीरा रोड पोलिस स्टेशनमधील ऑफिसरने सांगितले.
सोसायटीच्या सीसीटीव्हीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, एक पुरुष आणि एक महिला लिफ्टमधून दोन बोकड घरी घेऊन जात आहेत. तर दुसर्या फुटेजमध्ये रहिवासी सोसायटीबाहेर याचा निषेध करताना दिसत आहेत.
एका रहिवाशाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सर्व सोसायट्यांनी इमारतीमध्ये बकऱ्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असूनही, त्यांनी सर्वांचा विरोध झुगारून बोकड आणले. पोलिस किंवा सोसायटीची परवानगी न घेता बकऱ्यांना इमारतीच्या आत आणून सोसायटीचे नियम तोडले. आम्ही पोलीसांना विनंती करतो की त्यांनी बोकडांना घेऊन जावे आणि प्रकरण ताबडतोब मिटवावे.”