रात्री उशिरापर्यंतच्या शोधमोहिमेला अपयश
प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळी खुर्द येथील एका रहिवाशाने मार्कंडेय नदीत उडी मारली आहे. शनिवारी ही घटना घडली असून, नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व एसडीआरएफचे प्रयत्न सुरू होते.
सचिन माने (वय 45) राहणार कंग्राळी खुर्द असे त्याचे नाव आहे. नशेत त्याने नदीत उडी मारल्याचे सांगण्यात येते. कंग्राळी येथील मार्कंडेय पुलाजवळ तो उडी मारताना काही जणांनी पाहिले. स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, प्रयत्नांना यश आले नाही. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मार्कंडेय पुलावर सचिनचे चप्पल आढळून आले आहेत. शनिवारी सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली असून, रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.









