सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम : विद्यार्थी वेतन वाढवून देण्याची मागणी
बेळगाव : राज्यामध्ये निवासी डॉक्टर संघटनेकडून बेंगळूर येथे विद्यार्थी वेतन (स्टायपेंड) वाढविण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. बेळगाव बिम्स आवारामध्येही निवासी डॉक्टर संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे आंदोलन सुरुच असून डॉक्टरांनी रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. निवासी डॉक्टर संघटनेकडून विद्यार्थी वेतन वाढवून देण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आंदोलनाला आठवडा उलटला तरी सरकारकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील बिम्स रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या पीजी डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तत्काळ सेवा वगळता इतर सेवा देणे बंद करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यामध्येही सेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टर संघटनांकडून समर्थन देण्यात आले आहे. ठिकठिकाणी कामबंद आंदोलन सुरू आहे. यामुळे संबंधित रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
अत्यल्प विद्यार्थी वेतन न परडणारे
बेळगाव येथील निवासी डॉक्टर संघटनेकडून ओपीडीसेवा बंद करण्यात आली आहे. तत्काळ सेवा देण्यात येत आहे. अशा प्रकारे आंदोलन सुरू असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांकडून रक्तदान उपक्रम राबविण्यात आला. रक्तदानाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला आहे. इतर राज्याच्या तुलनेत डॉक्टरांना अत्यल्प विद्यार्थी वेतन देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला हे वेतन न परवडणारे आहे. इतर राज्याप्रमाणेच वेतन देण्यात यावेत, अशी मागणी करत हे आंदोलन सुरू आहे.









