ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांना स्थान देण्यात आलं आहे.
विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये रणनीती आखाण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष संघटनेत हे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.








