संजय खूळ : इचलकरंजी
स्वतःच्या करिअर बरोबरच दिव्यांग असलेल्या आपल्या मुलीलाही खेळामध्ये चमकदार बनवण्याचे ध्येय तिने ठेवले. लग्नानंतर पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत अनेक परिस्थितीशी सामोरे जात आणि 17 वर्षाच्या दिव्यांग मुलीला तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी कष्ट घेत तिळवणी (तालुका हातकणंगले ) येथील रेश्मा संतोष खोत हिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. रेश्मा हिची जिद्द आणि त्यासाठी घेतलेले कष्ट आजच्या नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
जिद्द ठेवली आणि प्रचंड मेहनत घेत कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली तर त्याला कसे यश मिळू शकते याचेच एक चांगले उदाहरण म्हणजे रेश्मा खोत चा जीवनप्रवास आहे. रेश्माचे प्राथमिक शिक्षण माणगाव वाडी (तालुका हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करीत माणगाव येथील ए. पी. मगदूम हायस्कूल मध्ये झाले. माणगाव वाडीतील मुलींचे दहावी झाल की त्यांचे लग्न लावून दिले जात. मात्र त्याला फाटा देत रेश्मा हिच्या आईने मुलीला पुढील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. बारावीपर्यंतचे शिक्षण रूकडी येथील माने जुनियर कॉलेजमध्ये तिने पूर्ण केले. खरे तर विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या रेश्माला अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते. परंतु एकूणच शैक्षणिक खडतर प्रवासात तिला पुढील यश मिळवता आलेच नाही. त्यानंतर तिचे लग्न झाले लग्नानंतर दीड वर्षात जन्मलेल्या मुलगी प्रिया हिला ऐकू येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी ए चे अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले येथे एम. ए. चा अभ्यासक्रम केला. घरातील कुटुंबाचा भार यावेळी बहुतांश पतीने सांभाळले. त्यामुळे रेश्मा हिला शिक्षण घेणे शक्य झाले.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना तिला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. जर जिद्दीने अभ्यास केलं तर स्पर्धा परीक्षाचे यश सहजपणे पार करू शकतो याचा आत्मविश्वास होता. परंतु एकूणच सर्व या परिस्थिती त रेश्मा हिला संघर्ष करावा लागला. तिने काही काळ इचलकरंजी येथील इंदिरा महिला संस्थेत नोकरीही केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा एक वर्षाचा योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. चार महिन्याचा फाउंडेशन कोर्स वगळता तिने कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे ट्युशन लावली नाही. काही काळ इचलकरंजी महानगरपालिकेच्या टागोर वाचनालयात ही तिने अभ्यास पूर्ण केला. परंतु हे सर्व करीत असताना तिने आपल्या मुलीकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. फिजिकल फिटनेस पासून तिच्या खेळाच्या सरावासाठी तिने अहोरात्र परिश्रम घेतले. मुलगी सराव करत असताना मैदानाच्या एका कडेला झाडाखाली बसून तिने अभ्यास केला परंतु स्पर्धा परीक्षेची जिद्द सोडली नाही. तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली.
या सर्व प्रवासात तिला कुटुंबाची चांगली साथ मिळाली. पतीचे प्रोत्साहन, आईने दिलेले बळ आणि भावाने केलेली मदत याच्या जोरावर ती कधीही हिंमत हारली नाही. अखेर तिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीच. दोन दिवसापूर्वी जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिचे नाव गुणवत्ता यादीत चमकले आणि रेशमाच्या जिद्द आणि चिकाटीचा प्रवास यशस्वी ठरला. रेश्मानी केलेला संघर्ष आणि त्यासाठी घेतलेली मेहनत अनेकांना नक्कीच प्रेरणादायी आहे.
आईचे स्वप्न पुर्ण
रेश्मा ईला दहावीनंतर शिक्षण घालताना गावातील अनेक महिलांनी रेशमाच्या आईला टोमणे मारले होते पुढे शिक्षण घेऊन आता पुन्हा चूल आणि मुलं सांभाळणार असेही आईला बोलणे खावे लागले होते परंतु आईचा विश्वास रेशमाने पीएसआय निवडीने सार्थ ठरवला.दोनच महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले.दीर्घकाळ जाहीर झालेल्या निकालामुळे हे यश पाहण्यासाठी वडील नाहीत याची खंत रेश्माला राहिली.